मुंबई: लोकसभेत आज विरोधीपक्षांनी मोदी सरकारविरोधात सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व खासदारांना व्हिप बजावण्यात आला आहे.


आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम आक्रमक झाला आहे. भाजपविरोधात तेलुगु देसमनं अविश्वास प्रस्ताव आणला आहे. याला काँग्रेससह बहुतेक सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. लोकसभेत भाजपचं बहुमत अगदी काठावरचं आहे. त्यामुळं भाजप बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सरकारच्या अविश्वास प्रस्तावावरुन शिवसेनेची भूमिका संभ्रमावस्थेत असली तरी ‘सामना’तून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

विश्वास(घात) दर्शक ठराव, बहुमताची झुंडशाही! या मथळ्याखाली सामनात अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

सामनात नेमकं काय म्हटलंय?

बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही. जनता सर्वोच्च आहे! भाजपकडे आकडय़ांचे बहुमत आहे. त्यामुळे मतदानानंतर सरकार पडेल असा विचार कोणी करीत नाही. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी हे कुरुक्षेत्रावरील युद्ध जिंकल्याच्या थाटात नेहमीच्या पद्धतीने भाषण करतील. सरकार पाडण्याइतका आकडा आपल्याकडे नाही हे विरोधकांना माहीत आहे, पण विरोधकांनी आणलेला हा अविश्वास ठराव सरकार पाडण्यासाठी नसून मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांची सालटी काढण्यासाठी आहे.

फक्त निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठीच डोंबाऱ्याचा खेळ करीत राहणे ही लोकशाही नाही. बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही. जनता सर्वोच्च आहे!

संबंधित बातम्या 

LIVE: अविश्वास प्रस्ताव: चर्चेपूर्वी मोदी म्हणाले लोकशाहीसाठी महत्त्वाचा दिवस  

स्पेशल रिपोर्ट : अविश्वास ठराव मोदी सरकारसाठी संधी की धोका?  

अविश्वास प्रस्ताव : 11 वाजता चर्चेला सुरुवात, सात तासांची वेळ राखीव