https://twitter.com/KapilSharmaK9/status/774243028642988032
कपिल शर्माने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीमध्ये मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते लाचखोरी प्रकरणात मध्यस्थी करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कपिल शर्माला आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं. अन्यथा मुंबईत त्याचं शुटींग कुठेही चालत असल्यास ते बंद पाडण्याचा इशारा खोपकरांनी दिला. त्यानंतर कपिलने पुन्हा ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे प्रकरण ?
कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ट्वीट करुन महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या मंजुरीसाठी 5 लाख मागितल्याचा आरोप केला. इतकंच नाही तर आपण आतापर्यंत 15 कोटींचा टॅक्स भरल्याची आठवणही त्याने करुन दिली. शिवाय ‘हेच का अच्छे दिन?’ असा खोचक सवालही विचारला. पण ट्वीटला काही तास उलटण्याच्या आधीच कपिलचं हे ट्विटरास्त्र त्याच्यावरच उलटण्याची शक्यता आहे.
मात्र या आरोपाविरोधात आता पालिका अधिकाऱ्यांनीच कपिलला नोटीस बजावली आहे. कपिल शर्माच्या वर्सोव्यातील घरी पालिका अधिकारी पोहोचले असता ते घरी नसल्यानं अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परतावं लागलं.
ज्या बांधकामासाठी लाच मागितली गेली, ते वर्सोव्यातील ऑफिसचं बांधकामच अवैध असल्याचा दावा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश मुदगल यांनी केला आहे. वर्सोव्याच्या ज्या भागात हे ऑफिस थाटलं जातंय, तो भाग, रहिवाशी बांधकामासाठी राखीव आहे. पण त्याच भागात व्यावसायिक बांधकाम सुरु असल्याचा आरोप आहे.
कपिलच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांसह महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपनंही लाचखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लाचखोर अधिकाऱ्याचं नाव कपिल शर्मानं उघड करावं असं आवाहन मुंबई पालिकेनं केलंय. याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ट्वीटद्वारे दिलं आहे.