मुंबई :  ‘नारायण राणेंचा स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आहे. मी नारायण राणेंचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझं मत कोणाला गेलं हे वेगळं सांगायला नको, ते जगजाहीर आहे.’ असं थेट वक्तव्य काँग्रेस आमदार नितेश राणेंनी केलं आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीवेळी नितेश राणेंनी भाजप उमेदवार प्रसाद लाड यांना मतदान केल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.


‘नारायण राणेंनी निवडणूक लढवली नाही हेच यांच्यासाठी चांगलं झालं. नाहीतर आज अनेकांचे वस्त्रहरण झाले असते. राणेंना फक्त ८-९ मतं अधिक हवी होती. आमच्याकडे २५ मतं अधिक होती. राजन तेली चौथा उमेदवार असूनही राणेंनी त्याला निवडून आणलं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी 8-9 मतं आणणं अवघड नव्हतं.’  असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.

दरम्यान नितेश राणेंनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यताही आहे. याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, ‘कारवाई करण्याची हिंमत तर करू देत, एवढे 'आदर्श' नेते असताना काय कारवाई करणार? महाराष्ट्राला चांगले विरोधी पक्षनेते लाभले आहेत. कमी बोलतात, पाहिजे तेवढंट बोलतात.’ असं म्हणत नितेश राणेंनी विखे-पाटलांवरही निशाणा साधला.

काही जण आयुष्यभर पोलिंग एजंटच राहिले : नितेश राणे

दरम्यान, यावेळी नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांवर देखील टीका केली. ‘काही जण आयुष्यभर पोलिंग एजंटच राहिले, आमदार होऊ शकले नाही. सचिवांना मतदानावर लक्ष ठेवावं लागणं हे दुर्दैवच.’ असं म्हणत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांवर निशाणा साधला.

आमच्या दोन आमदारांनी उघडपणे विरोधी भूमिका घेतली : विखे-पाटील

दरम्यान, याप्रकरणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नितेश राणेंवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ‘पक्षाच्या विरोधात ज्यांनी मतदान केलं त्यांच्यावर आवश्यक की कारवाई पक्ष करेल. याबाबत आम्ही पक्ष पातळीवर निर्णय घेऊ. जो पर्यंत पक्षात आहात तोवर अधिकृत उमेदवाराला मतदान करणे बंधनकारक आहे. आमच्या पक्षाच्या दोन आमदारांनी उघडपणे विरोधी भूमिका घेतली आहे.’ असं विखे-पाटील यावेळी म्हणाले.

VIDEO : 



संबंधित बातम्या :

LIVE : विधानपरिषद पोटनिवडणुकीत मिलिंद नार्वेकर पोलिंग एजंट

युतीच्या आमदारांचे 'लाड', पंचतारांकित 'ताज'मध्ये 'प्रसाद'