मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातोश्रीवर डिनरसाठी जाण्यास वेळ आहे, मात्र घटनास्थळी जाण्यास वेळ नाही, असा घणाघात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला. अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे आज विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले.
विधानसभेचे कामकाज सुरु होताच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी स्थगन प्रस्ताव आणला, पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी विधानसभेत निवेदन देऊन चर्चेला स्थगन प्रस्तावाला छेद देण्याचा प्रयत्न केला.
“कोपर्डी, कर्जत येथील घटनेबाबत मी दिलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारला नाही. पोलिसांनी माहिती दिल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनास्थळी जाण्यास वेळ नाही. मात्र मातोश्रीवर जाण्यास मुख्यमंत्र्यांकडे वेळच वेळ आहे. हे सरकार फक्त ट्विटरवर चालले आहे. सरकार आमच्या सदस्यांना बलात्कारसारख्या गंभीर घटनेवर चर्चा करू देत नाही. उद्या सुद्धा आम्ही याबाबत स्थगन प्रस्ताव मांडणार आहोत”, असे नितेश राणे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केल्यानंतरही विरोधक चर्चेच्या मागणीवर ठाम राहिले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आजच चर्चा करावी,अशी मागणी केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही ही घटना अतिशय गंभीर असून सरकार निवेदन देऊन विषय संपवू शकत नाही, असे स्पष्ट केले.
विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे विधानपरिषदेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. विरोधक अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करू लागल्याने सभागृहात गोंधळ उडाला. मात्र अध्यक्षांनी चर्चेची मागणी फेटाळून लावली.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपींना कडक शासन करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारतर्फे नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर गटनेत्यांच्या झालेल्या बैठकीत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर उद्या मंगळवारी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.