मुंबई : उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरेंमधील संपत्तीचा वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. कारण हायकोर्टात बाळासाहेबांच्या संपत्तीवरुन जयदेव यांनी उद्धव ठाकरेंबाबत गौप्यस्फोट केला आहे. “उद्धवनं बाळासाहेबांना अंधारात ठेऊन प्रॉपर्टीच्या कागदांवर सही घेतली.”, असा जबाब जयदेव ठाकरेंनी हायकोर्टात दिला आहे.

 

जयदेव ठाकरेंची हायकोर्टात उलटतपासणी सुरु

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मालमत्तेवरुन, ठाकरे बंधूमध्ये सुरु झालेल्या वादाचा हायकोर्टात दुसरा अंक पाहायला मिळाला. उद्धव ठाकरेंचे भाऊ जयदेव ठाकरेंची हायकोर्टात उलटतपासणी सुरु झाली आहे. यावेळी त्यांनी धक्कादायक माहिती हायकोर्टासमोर दिली.

 

बाळासाहेबांनी जयदेव ठाकरेंना काय सांगितलं होतं?

 

“आपल्या दोघात झालेल्या बोलण्याबाबत कधीही उद्धवशी चर्चा करु नकोस. कारण तुमच्या दोघात मला वाद नको आहे, असं बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं.”, असे जयदेव ठाकरेंनी हायकोर्टात सांगितलं.

 

उद्धवनी 'त्या' कागदावर सही घेतली!

 

“साल 2011 मध्ये बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की, ते मला प्रॉपर्टीमधील काही हिस्सा देणार आहेत. एकदा मला बाळासाहेबांनी सांगितलं होत की, उद्धवनं काही कागदपत्रांवर माझी सही घेतली आहे, पण त्यात काय लिहिलय हे मला सांगितलं नाही.” असा जबाब जयदेव ठाकरेंनी हायकोर्टात दिला.

 

“उद्धव माझा फोनही घेत नाही, एसएमएसलाही उत्तर देत नाही

 

“हायकोर्टात याचिका दाखल केल्यापासून उद्धव माझा फोन घेत नाही आणि एसएमएसलाही उत्तर देत नाही. गेल्या 3 वर्षांपासून आमचा कोणताही संपर्क नाही. बाळासाहेबांच्या इच्छापत्रासंदर्भात मला इंटरनेटवर माहिती मिळाली.”, असेही जयदेव यांनी हायकोर्टात सांगितले.

 

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसाठी गच्चीवर रुम

 

मी मातोश्रीवर राहत असताना प्रत्येकाची वेगळी खोली असली तरी किचन एकच होतं. बाळासाहेब आणि आई पहिल्या माळ्यावर राहायचे. त्यांच्या शेजारच्या खोलीत मी राहयचो आणि उद्धवसाठी गच्चीवर एक रुम बांधली होती.

 

पैसा भावाभावांमध्ये वैर निर्माण करतो हे अनेकदा समोर आलं आहे. पण बाळासाहेबांच्या संपत्तीवरुन ठाकरे कुटुंबालाही कटघऱ्यात यावं लागलं आहे. ज्याची अनेक आवर्तनं यापुढंही महाराष्ट्राला बघायला आणि ऐकायला मिळणार आहेत.