मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या हिरेव्यापारी नीरव मोदीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या मालकीच्या तब्बल 68 महागड्या पेंटिंग्जच्या लिलावाला स्थगिती देण्याची मागणी करत नीरव मोदीच्या कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
'कॅमेलॉट एंटरप्रायझेस'च्या वतीने करण्यात आलेल्या या याचिकेत लिलावाला परवानगी देण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. 'सॅफ्रन ऑर्ट' या कंपनीमार्फत या पेंटिग्जचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. मात्र एकूण 68 पेंटिग्जपैकी केवळ 19 पेटिंग्ज या नीरव मोदीच्या मालकीच्या आहेत. अन्य पेंटिग्जची मालकी अन्य कंपनींकडे आहेत, असा दावा या याचिकेमध्ये केला आहे. या याचिकेवर बुधवारी हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
आयकर विभागाकडे मोदीची सुमारे 95 कोटी रुपयांची थकबाकी असून या वसुलीसाठी पेंटिग्जचा लिलाव करण्याची परवानगी मुंबईतील पीएमएलए कोर्टानं दिली आहे. सध्या या पेंटिग्जचा ताबा अमंलबजावणी संचालनालयाकडे आहे. चित्रकार राजा रविवर्मा, व्ही एस गायतोंडे, एम.एफ. हुसैन, अकबर पदमसी आदी नामवंत कलाकारांच्या या पेंटिग्ज असून त्याची किंमत कोटीच्या घरात असण्याची शक्यता आहे.
याचबरोबर मोदीच्या 11 आलिशान गाड्यांचा लिलाव करण्याची परवानगीही विशेष न्यायलयाने दिली आहे. नीरव मोदीला सध्या लंडनमध्ये अटक झाला असून भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नात आहे.