मुंबई : स्विगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्यांवर आता एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध सुरक्षा प्रशासन आता करडी नजर ठेवणार आहे. स्विगी, झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉईजना आता परवाना घेणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही अशा वेबसाईट्सवरुन फूड ऑर्डर करणार असाल, तर डिलीव्हरी बॉईजकडे परवाना आहे का, याची खातरजमा करुन घ्या.


डिलीव्हरी बॉईज अस्वच्छ ठिकाणांहून खाणं पुरवत असल्याचं किंवा खाणं गैररित्या हाताळत असल्याचं काही घटनांमधून समोर आलं होतं. मात्र अशा लोकांवर कारवाईसाठी एफडीएकडे माहिती नसायची. आता मात्र परवाना बंधनकारक असल्यानं कारवाईसाठी एफडीएकडे डिलीव्हरी बॉईजची माहिती असणार आहे. गेल्यावर्षी अस्वच्छतेच्या कारणावरुन स्विगी, झोमॅटो, फुडपांडा, उबर-इट्स यांना अन्न व औषध प्रशासनाने नोटीसही पाठवली होती.

परवाना आल्यामुळे ऑनलाईन फूड विक्री कंपन्यामध्ये काम करणाऱ्या डिलीव्हरी बॉयची प्राथमिक माहिती आणि आरोग्याच्या तपशिलाची नोंद अन्न व औषध प्रशासनाकडे राहणार आहे. डिलीव्हरी बॉईजच्या परवान्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना 100 रुपयांचा अर्ज भरावा लागेल. अर्जात सगळी प्राथमिक माहिती भरून द्यावी लागणार आहे. परवान्याचा कालावधी वर्षभरासाठी असेल. डिलिव्हरी बॉयने अन्नाची विक्री/डिलिव्हरी करताना परवाना स्वत:कडे बाळगणे अनिवार्य असणार आहे.