मुंबई : महाराष्ट्रातल्या रात्रशाळा कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाहीत. असं शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी स्पष्ट केलं आहे. ते आज एबीपी माझाशी बोलत होते.
रात्र शाळा बंद होणार असं म्हणत मुंबईत काही विद्यार्थ्यांनी आज मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं आणि रात्रशाळा बंद करु नका अशी मागणी केली. त्यानंतर तावडेंनी एबीपी माझाशी बोलताना हे स्पष्टीकरण दिलं आहे.
यापूर्वी रात्रशाळेत शिक्षकांनी अतिरिक्त काम करावं लागत होतं. मात्र, आता जे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत, त्यांची पूर्णवेळ रात्रशाळेत शिकविण्यासाठी नियुक्ती केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण:
‘सरकारनं नुकत्याच घेतलेल्या निर्णयांमुळे कष्टकरी विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या रात्रशाळा नव्या शैक्षणिक वर्षातच बंद पाडतील.’ असा आरोप शिक्षक भारती या संघटनेनं केला होता.
शासनाच्या नव्या निर्णयाने (जीआरने) १२५ वर्षांची रात्रशाळांची परंपरा बंद होण्याची भीती या संघटनेनं व्यक्त केली आहे. राज्यातील १५०हून अधिक रात्रशाळा व रात्र ज्युनिअर कॉलेज यामध्ये दिवसाच्या शाळेतील अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक रात्री अर्धवेळ अध्यापनाचे काम करतात.
रात्रशाळा मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक भारतीने या जीआरवर संताप व्यक्त केला होता. रात्रशाळांमुळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याची आवई या शासन निर्णयात उठवली असल्याचा आरोप शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी केला होता.
संबंधित बातम्या:
‘सरकारच्या नव्या निर्णयानं रात्रशाळा बंद होणार’, शिक्षक भारतीचा आरोप