मुंबई : दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत मुस्लीम तरुणांची माथी भडकवल्याचा आरोप असलेला इस्लामी उपदेशक डॉ. झाकिर नाईक याच्या माझगावमधील पाच मालमत्तांवर जप्ती आणण्याचे आदेश मुंबईच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.


‘क्रिस्टल रेसिडेन्सी’ या इमारतीच्या ए विंगमधील ए-103 हा एक हजार 360 चौ. फुटांचा व्यावसायिक गाळा, जास्मिन सोसायटीमधील बी-1005 व बी-1006 हे दोन फ्लॅट, मारिया हाईट्स या इमारतीतील 1701 व 1702 हे दोन फ्लॅट अशा पाच मालमत्तांवर टांच आणण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत.


52 वर्षीय झाकिर नाईकच्या प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषणांमुळे दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन मिळत असल्याचे उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये त्याची मुंबईतील ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ ही संस्था बेकायदा ठरवली. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच (एनआयए) कडून त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे नोंदवले. हा गुन्हा नोंदवला गेला तेव्हा नाईक देशाबाहेर होता जो अजुनही भारतात परतलेला नाही.


‘नाईकविरुद्ध गुन्हे नोंदवल्यानंतर त्याला वेगवेगळ्या मार्गांनी मिळणारा निधी थांबला आहे. तो आता परदेशी नागरिकत्व मिळवण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये प्रयत्नात आहे. त्यासाठी निधी आवश्यक असल्याने तो आपल्या माझगावमधील मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नात आहे’, असे निदर्शनास आणत या मालमत्तांवर जप्ती आणण्याची परवानगी मागणारा अर्ज ‘एनआयए’ने कोर्टात केला होता. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने तो मान्य करत पाचही मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.