मुंबई : प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणासाठी साध्वी प्रज्ञा यांनी केलेला अर्ज मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं स्वीकारला आहे. मात्र जेव्हा कोर्ट बोलावेल तेव्हा हजर राहावं लागेलं असं कोर्टानं त्यांना सांगितलं आहे. साल 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याच्या नियमित सुनावणीसाठी आपण दररोज कोर्टात येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला गैरहजर राहण्याची मुभा द्यावी. कोर्टाला जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा हजर राहण्यास आपण तयार आहोत, असा अर्ज या प्रकरणातील आरोपी आणि भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावतीनं करण्यात आला होता.


वास्तविक गेल्यावर्षी एनआयएनं मुंबई उच्च न्यायालयात आश्वासन दिलं होतं की डिसेंबर 2020 पर्यंत हा खटला निकाली काढला जाईल. मात्र लॉकडाऊनपूर्वीच्या सहा महिन्यांत या खटल्यातील केवळ 14 जणांचीच साक्ष नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात एकूण 475 साक्षीदार आहेत ज्यातील जवळपास 300 साक्षीदारांची साक्ष अद्याप बाकी आहे. मार्चपासून कोरानाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे यात काहीही प्रगती झालेली नव्हती. मात्र डिसेंबर 2020 पासून याची नियमित सुनावणी सुरू आहे. गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे निर्देश हायकोर्टानं याआधीच एनआयए कोर्टाला दिलेले आहेत. मात्र अनेकदा या खटल्याच्या सुनावणीला काही वकील हजरच राहत नाहीत. या खटल्याला जाणून बुजून विलंब केला जातोय, असा आरोप या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांनी केला होता.


29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. यात 7 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदिप डांगे यांना अटक करून त्यांच्यावर एनआयए विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील काही संशयित आरोप अद्याप फरार असून वरील सर्व आरोपी जामीनवर आहेत.