मुंबई : सलग सातव्या दिवशी बेस्टच्या संपामुळे मुंबईकर त्रस्त असताना मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई मात्र अल्पसंख्यांक आयोगात कोणाची केबिन किती मोठी आहे, हे पाहण्यात व्यस्त असल्याची खंत आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी व्यक्त केली आहे.


शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे नेतृत्व करणाऱ्या हाजी अरफात शेख यांनी नुकताच भाजप प्रवेश केल्यानंतर अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. तर उपाध्यक्ष पद सुभाष देसाई यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या ज. मो. अभ्यंकर यांना देण्यात आलं.


मात्र गेल्या काही दिवसांपासून उपाध्यक्षांची केबिन अध्यक्षांच्या केबिनपेक्षा लहान असल्याने चांगलाच वाद आयोगात रंगला होता. या क्षुल्लक वादासाठी आज स्वतः शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईतील आयोग कार्यालयाला भेट देऊन केबिनची पाहणी केल्याचा दावा आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी केला आहे.


यावेळी भूमिपुत्रांना नोकऱ्यांसाठी आरक्षणाची मागणी करणारे शिवसेना नेतेच बेस्ट संपासाठी जबाबदार असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. तर मुंबईकरांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार रस्त्यावर उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.