मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांच्या टोईंग प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. स्तनपान करणाऱ्या महिलेची गाडी टो करुन नेणाऱ्या पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे पोलिसांची बाजू मजबूत झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे दोन व्हिडीओ मागील दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. मालाडमध्ये स्तनपान करणाऱ्या महिलेची गाडी टो करुन नेणाऱ्या पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात होता.

दबाव वाढल्यानंतर टो करण्याचा आदेश देणारे मुंबई वाहतूक पोलिस हवालदार शशांक राणे यांचं निलंबन करण्यात आलं आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. परंतु तपासादरम्यान आणखी काही एक व्हिडीओ समोर आला असून जो पोलिसांची बाजू स्पष्ट करतो.

या नव्या व्हिडिओत टो करण्याआधी बाळ गाडीबाहेर होतं आणि संबंधित महिला गाडीतूनच पोलिसांशी वाद घालत आहे. म्हणजेच जेव्हा गाडी टो केली, तेव्हा महिलेच्या पतीने हे बाळ तिच्या हातात दिलं. पोलिस सर्व व्हिडीओंची तपासणी करत आहेत.



"जर महिला जबरदस्तीने बाळासह गाडीत बसली होती, तर पोलिसांनी तिचा आणि बाळाचा जीव धोक्यात घालायला नको होता. पोलिसांनी हे प्रकरण समजुतीने हाताळायला हवं होतं," असं पोलिस उपायुक्त दीपक देवराज यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात महिला आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पोलिसांची कारवाई चुकीची होती, असं तिचं म्हणणं आहे. परंतु तक्रारदार महिला पोलिसांवर कारवाई करण्याच्या बाजूने नाही.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. तपास अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असं पोलिसांतर्फे सांगण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?
शनिवारी व्हायरल झालेल्या व्हिडीओत मालाडमध्ये नो पार्किंग झोनमध्ये एक कार उभी करण्यात आली होती. कारमालक काही कामानिमित्त बाहेर गेला होता, तर या कारमध्ये ड्रायव्हरच्या सीटमागे महिला (त्याची पत्नी) आपल्या सात महिन्याच्या लेकराला दूध पाजत बसली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी बळजबरीने ही कार टो करुन नेली.

महिलेवर कारवाई व्हावी : महिला आयोग
दरम्यान मुंबईच्या मालाडमधील टोईंगप्रकरणी आईवर कारवाई व्हावी, असं मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी व्यक्त केलं. आईने सात महिन्याच्या बाळाचा जीव धोक्यात घातला असून तिच्या बेजबाबदारपणामुळे तिच्यावर कारवाई व्हावी असं महिला आयोगाने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

टोईंगवेळी कारमधील 'त्या' महिलेकडे बाळ नव्हतं?

कारमध्ये महिला लेकराला दूध पाजताना पोलिसांकडून टोईंग


आधीचा व्हिडीओ



नंतरचा व्हिडीओ