ठाणे : ठाणे-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सुरू असलेलं रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम जून 2019 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. रविवारी या कामाची रेल्वे अधिकाऱ्यांसह खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली. या मार्गिकेमुळे मुंबईकर लोकल प्रवाशांचा प्रवास लवकरच अधिक फास्ट होणार आहे.
पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मुंब्रा स्थानकाजवळ खाडीत भराव टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र हा भराव खचून डंपर आणि अजस्त्र पायलिंग मशीन खाडीत बुडाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी आज या कामाची पाहणी केली.
ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, तिथे यापुढे दगडी चिरेबंदी टाकण्यात येणार आहे.तसेच या पुढे काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. शिवाय कामाचा वेग पाहता पुढील वर्षी जून अखेरपर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण होईल, असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान या नव्या ट्रॅकमुळे लोकल्सची वाहतूक संपूर्णपणे स्वतंत्र होणार असून एक्स्प्रेस गाड्यांमुळे लोकल्सना होणारा विलंब टळू शकणार आहे. मध्य रेल्वेवर फक्त ठाणे ते दिवा दरम्यान फास्ट लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या एकाच ट्रॅकवर धावत असून कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ल्यापर्यंत एक्स्प्रेस गाड्यांचा स्वतंत्र ट्रॅक अस्तित्वात आहे.