मुंबई : दोन लाखांवरच्या शेतकरी कर्जदारांसाठी कर्जमाफीची नवी योजना आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कॅबिनेट बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक बेस्ट टीम आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.


ज्या शेतकऱ्यांवर दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज आहे, अशा कर्जदारांसाठी वेगळी योजना आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोबतच जे नियमित कर्जफेड करत आहे, त्यांच्यासाठीही एक वेगळी योजना राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणतीही योजना राबवण्याच्या आधी त्याचा सारासार विचार करुनच राबवणार असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाकरे सरकारने हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारचा शपथविधी आज पार पडला. त्यानंतर ठाकरे सरकारने मंत्र्यांची पहिली कॅबिनेट बैठक बोलावली. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केली.

आपली टीम बेस्ट आहे : मुख्यमंत्री
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सर्व मंत्री व राज्यमंत्री उपस्थित होते. प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना मुख्यमंत्री म्हणाले, याठिकाणी भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले असले तरी आपण जनतेतून निवडून आलेलो असल्याने त्यांचे प्रश्न सोडविणे यावर सगळे एक आहोत. एक कुटुंब म्हणून याठिकाणी आपणास काम करायचे असून एखाद्या विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली तरी राज्यासाठी हिताचे काय त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे. आपली टीम बेस्ट असून प्रत्येक सामना जिंकेलच आणि राज्याला अधिक प्रगतीपथावर पोहोचवेल असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

8 जानेवारीला विशेष अधिवेशन
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 334 मधील अनुसूचित जाती-जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 8 जानेवारी 2020 रोजी बोलवावे, असेही मंत्री परिषदेच्या बैठकीत ठरले आहे.

हेही वाचा - शपथविधीनंतर तिन्ही पक्षात नाराजीचा सूर, शिवसनेचे राऊत, सावंत, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण पक्षावर नराज?

Aditya Thackeray | मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे शपथ घेतो की... | ABP Majha