मुंबई : सत्तेच्या समीकरणात फक्त एका आमदारापुरतं अस्तित्व उरलेल्या मनसेने कात टाकण्याची तयारी पूर्ण केली आहे. मुंबईतल्या गोरेगावमधील नेस्को मैदानावर आज मनसेचं महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे काय गर्जना करणार? याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. शिवाय आजच्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने राज ठाकरेंचे पुत्र अमित यांच्या राजकारणातल्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.


आज सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दीपप्रज्वलन करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाअधिवेशनाचं उद्घाटन करतील. त्यानंतर दोन-तीन नेत्यांची भाषणं होतील. या महाअधिवेशनात विविध मुद्द्यांवर सात ते आठ ठराव मांडले जाणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.


तर "दिवसभर मनसेचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी नऊ वाजता राज ठाकरे नव्या झेंड्याचं अनावरण करतील, तर संध्याकाळी सहानंतर राज ठाकरेंचं भाषण होईल. तसंच अमित ठाकरे यांच्यावर वेगळी जबाबदारी दिली जाईल," असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.


राजकीय आखाड्यात पुन्हा जोमानं उतरण्यासाठी राज ठाकरेंचं इंजिन हिंदुत्वाच्या रुळावर पळवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मनसे भगव्या झेंड्यासह पुढील वाट धरणार आहे. मनसेच्या या नव्या चेहऱ्याने महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण बदलणार का यावर राजकीय विश्लेषकांमध्ये खलबतं सुरु आहेत.


नव्या झेंड्याचं अनावरण होणार?
आजच्या अधिवेशनात राज ठाकरे मनसेच्या कोणत्या झेंड्याचं अनावरण करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी मनसेचे नवे झेंडे एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. मनसेच्या जुन्या झेंड्यातला हिरवा आणि निळा हे रंग हटवण्यात आले असून, फक्त भगवा रंग ठेवण्यात आला आहे. पक्षाचा झेंडा म्हणून भगव्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा, तर निवडणुकीचं चिन्ह म्हणून भगव्यावर रेल्वे इंजिन असे मनसेचे नवे झेंडे आहेत. राज ठाकरेंच्या मनसेची हिंदुत्त्वाच्या दिशेनं वाटचाल सुरु झाल्याचं भगव्या झेंड्यातून प्रतीत होत आहे.


राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत
दरम्यान, नेस्को ग्राऊंडवर मध्यरात्रीपासूनच महाराष्ट्रभरातून मनसेचे कार्यकर्ते दाखल होत आहेत. पुणे, सातारा, जळगाव, पिंपळगाव, नाशिक इथूनही कायकर्ते मुंबईत पोहोचत आहेत. आज राज ठाकरे काय बोलणार आणि मनसेचा नवीन ध्वज प्रत्यक्ष बघण्याची उत्सुकता त्यांच्या मनात आहे.


डोंबिवलीतून कार्यकर्ते रवाना
मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी डोंबिवलीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात रवाना झाले आहेत. डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेतून कार्यकर्त्यांच्या बसेस रवाना झाल्या आहे. डोंबिवली हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो. डोंबिवलीचा समावेश असलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हेदेखील निवडून आले आहेत. त्यामुळे डोंबिवलीत अधिवेशनापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. आज सकाळी सहा वाजल्यापासून शेकडो कार्यकर्ते बसमधून मुंबईकडे रवाना झाले.


दहा हजार लोकांच्या जेवणाची तयारी
मनसेच्या महाअधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरु आहे. या अधिवेशनात दहा हजार लोकांचं जेवण तयार होत आहे. नाश्त्यासाठी उपमा आणि चहा तर जेवणात वरण, भात, भाजी, पोळी आणि गोड पदार्थ असा जेवणाचा बेत आहे.


संबंधित बातम्या


राज ठाकरे भगव्या वाटेवर आहेत का? हिंदुत्वाच्या मुद्द्याचा मनसेला किती फायदा होईल?


महाअधिवेशनासाठी मनसेची जय्यत तयारी; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष