मुंबई : मुंबईतील देवनार आणि मुलुंड या कचराभूमीची कचरा साठवण्याची क्षमता संपल्यानं कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता कचरा टाकण्यासाठी तळोजामधील कचराभूमी मुंबईला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेनं यासाठी नुकतेच 10 कोटी रुपये राज्य सरकारला दिले आहेत.


मुंबईतल्या डम्पिंग ग्राऊंडची सध्याची कचरा ग्रहण करण्याची क्षमता संपत आली आहे.  एकीकडे मुलुंडच्या कचराभूमीला टाळं लागलं आहे, तर देवनारची कचराभूमी तुडूंब भरली आहे. शिवाय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्याला आग लावली जायची. ज्यानं आसपासच्या परिसरातील स्थानिकांचं आरोग्य बिघडू लागलं होतं. पण हा प्रश्न सोडवण्यासाठी अखेर 50 हेक्टरची जमीन मिळवण्यात महापालिकेला यश आले आहे.

नवी मुंबईतल्या तळोजा येथे 50 हेक्टर जमीन असून येथील 38.87 हेक्टर जागा राज्य सरकारची आहे. तर उर्वरित 12.20 हेक्टर जागा खासगी मालकाची आहे. या जमिनीसाठी महापालिकेने राज्य सरकारला दहा कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे ही जमीन लवकरच महापालिकेच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.