मुंबई : दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या अय्यारी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिलं आहे. या सिनेमात संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेत काही बदल सुचवले होते. मात्र निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा सिनेमा 16 फेब्रुवारीला रिलीज होईल.


सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेला अय्यारी सिनेमाचं कथानक लष्करातील भ्रष्टाचारावर आधारित आहे. आपल्या प्रतिनिधींनी सिनेमाला मंजुरी दिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देऊ नये, असं सांगत संरक्षण मंत्रालयाने हरकत घेतली होती.

शनिवारी संरक्षण मंत्रालयासाठी 'अय्यारी' सिनेमाचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्रालयातील काही अधिकारीही या शोला उपस्थित होते. मात्र सिनेमा पाहून त्यांनी या हिरवा कंदील दिलेला नव्हता. सिनेमात काही बदल करण्यास निर्मात्यांना सुचवण्यात आलं होतं.

सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते बदलण्यास सांगण्यात आले होते. अर्थात ती दृश्य काय आहेत, याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली.

अय्यारी हा सिनेमा सुरुवातीला 25 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र त्याच दिवशी पद्मावत आणि पॅडमॅन यांसारखे दोन तगडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमनेसामने आल्याने अय्यारीने आपली रिलीजिंग डेट 9 फेब्रुवारीला हलवली. मात्र आता ही तारीख पुढे ढकलत 16 फेब्रुवारी करण्यात आली आहे.

‘अय्यारी’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी गुरु-शिष्याच्या भूमिकेत आहेत. तर अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह, राकुल प्रीत सिंह, कुमुद मिश्रा, पूजा चोप्रा, आदिल हुसैन आणि विक्रम गोखले यांच्यासारखे कसलेले कलाकार आहेत.