मुंबई : एनडीएची हत्या झाली आहे, एनडीए फक्त बैठकीपुरतंच असल्याचा हल्लाबोलही खासदार संजय राऊतांनी शपथ विधीनंतर केला आहे. तसंचआम्ही मंत्रिपदासाठी हपापलेलो नाही, हा सगळा आकड्यांचा खेळ आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही आमचं म्हणणं मांडू असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
एनडीए केवळ कागदोपत्री आहे. जेव्हा भाजपला पाठिंबा हवा असतो तेव्हा त्यांना एनडीएची आठवण येते, राष्ट्रपतीपदाची निवडणूक, उपराष्ट्रपदाची निवडणूकीवेळी एनडीएला विचारलं जातं. मात्र बाकी वेळी एनडीएचा विचार केला जात नाही, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.
आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेलाही कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी शिवसेनेची मागणी होती, मात्र भाजपनं कोणत्याही मित्रपक्षाला या मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. भाजपच्याच नेत्यांचा आज शपथविधी झाला आहे.
आजच्या ज्या मंत्र्यांचा शपथविधी झाला, त्यांना राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे, तर 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही उपस्थित होते.
एकूण 13 मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर प्रमोशन देण्यात आले आहे, तर 9 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांमध्ये 4 माजी अधिकारी आहेत. धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमन, पियुष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी या राज्यमंत्र्यांना प्रमोशन मिळालं असून, त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे.