मुंबई :  राष्ट्रवादीने भाजप- शिवसेना सत्तेविरोधात लोकांमध्ये परिवर्तन करण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरुन सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. मात्र माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील परिवर्तन सभा राष्ट्रवादीने रद्द केली आहे.


एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरात राष्ट्रवादीला परिवर्तन नको आहे का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जात आहे. मुक्ताईनगरऐवजी राष्ट्रवादीची परिवर्तन सभा आता जामनेरमध्ये आयोजित करण्यात आली आहे.


आधीच्या कार्यक्रम पत्रिकेत मुक्ताईनगरमध्ये आज दुपारी 2 वाजता सभा होणार होती. मात्र राष्ट्रवादीनं आज दाखवलेल्या कार्यक्रम पत्रिकेत मुक्ताईनगरऐवजी जामनेरमध्ये परिवर्तन सभा होणार असल्याची माहिती दिली आहे.


भाजपवर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंना चुचकारण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. मंत्रिपदावरुन हटल्यापासून खडसेंना भाजपने एकप्रकारे बाजूला सारलं आहे, त्यामुळे खडसे नाराज आहेत. नाराज खडसेंना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी करत असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहेत.


राष्ट्रवादीनं 9 जानेवारीपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘परिवर्तन सभा’ आयोजित केल्या आहेत. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने आणि महाडच्या चवदार तळ्याच्या परिसरात पहिली सभा घेवून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा सुरु झाली आहे. केंद्र आणि राज्यसरकारचे अपयश लोकांसमोर मांडून लोकांमध्ये जावून भाजप-सेनेच्याविरोधात परिवर्तन करणं हा या परिवर्तन यात्रेचा उद्देश आहे.