मुंबई : रेल्वेमध्ये सीटवर पाय ठेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांबद्दल आता सोशल मीडियावर चळवळ सुरु झाली आहे. अशा बेशिस्त प्रवाशांचे फोटो सोशल मीडियावर वायरल केले जात आहेत. अनेकदा अशा बेशिस्त प्रवाशांना शिस्त शिकवण्याचा प्रयत्न सहप्रवासी करत असतात. आता 'एबीपी माझा'ने याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.


लोकल असो की एक्स्प्रेस अनेक बेशिस्त प्रवासी आपल्यासोबत प्रवास करत असतात. समोरच्या सीटवर पाय ठेवून प्रवास करणारे प्रवासी तर हटकून आपल्या मागे पुढे असतात. अशा वेळी काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. आता या विरोधात एक चळवळ उभी राहिली आहे. सीटवर पाय ठेवणाऱ्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.


सीटवर पाय ठेवले जाऊ नये हे सांगण्याची गरज नाही किंवा असे प्रकार होऊ नयेत यासाठी कोणत्या कायद्याची गरज नाही. रेल्वेला याबाबत विचारले असता त्यांनी देखील प्रवाशांनी आपली जबाबदारी समजून घेण्याचं आवाहन केलं आहे. काही प्रवाशांनी याबाबत कडक कायदा करण्याची गरज असल्याचं म्हटलं. तर सीटवर पाय ठेवणारे अनेकदा सांगूनही ऐकत नसल्याचे अनुभवही अनेकांनी सांगितले.


रेल्वेने प्रवास करताना आपली काही जबाबदारी आहे, ती प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. रेल्वे आपली आहे असं समजून तिचा योग्य वापर केला पाहिजे,  असं काही प्रवाशांनी सांगितलं.


'एबीपी माझा'ने याबाबत आता जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या आसपास देखील असे अनेक प्रवासी असतील जे सीटवर पाय ठेऊन, ती सीट घाण करताना तुम्ही पाहत असाल. तर तुम्ही देखील त्यांना चांगल्यापणे समजावून बघा आणि त्यांनी ऐकले नाही तर सोशल मीडियाचा आधार घेऊन अशा प्रवाशांच्या विरोधातील चळवळीत सहभागी व्हा.