Maharashtra Opposition Leader : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आता विरोधी पक्ष नेतेपद कोणाला मिळणार याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संख्याबळ जास्त असल्यामुळे आमचाच विरोधी पक्ष नेता असेल असा दावा सुरु झाला आहे.


उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी बाकांवर बसणार आहेत. सध्याची राजकीय स्थिती पाहता महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष आहे. विधानसभेत राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत. शिवसेनेकडे 55 आमदार असले तरी 39 आमदारांनी बंडखोरी करत वेगळा मार्ग स्वीकारला. शिंदे गटातील या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केलं आहे. शिंदे गटाने आपणच मूळ शिवसेना असल्याचं दावा केल्याने प्रकरण न्यायालयात आले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला हे जवळपास निश्चित झालं. 


राष्ट्रवादीच्या वतीने सध्या विरोधी पक्ष नेते पदासाठी जयंत पाटील, छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या नावाचा विचार सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. महाविकास आघाडीची बैठक होईल आणि याबाबत निर्णय होऊ शकेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.


राष्ट्रवादीच्या आमदारांचे नेते अजित पवार असून, विधिमंडळाचे नेते जयंत पाटील आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासुद्धा जवळचे आहेत. त्यामुळे त्यांना ते पद मिळण्याची अपेक्षा आहे. पण अजित पवारही विधानसभेत राष्ट्रवादीचे अनुभवी आमदार आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्येही अजित पवार यांचा वरचष्मा होता. त्यामुळे अजित पवारांचा दबदबा देखील कमी नाही


राजकीय वर्तुळात जरी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील जयंत पाटील, छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा असली तरी अंतिम निर्णय हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेत असतात. त्यामुळे शरद पवार या तीन वरिष्ठ नेत्यांमधील एकाला संधी देणार की धक्कातंत्राचा अवलंब करणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.


उद्धव ठाकरेंचा राजीनामा, एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी 29 जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमवेत राजभवनावर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. परंतु नाट्यमय घडामोडींनी भरलेल्या या दिवसात एकापाठोपाठ एक ट्विस्ट पाहायला मिळत होते. चर्चा अशी होती की, भाजप-शिंदे गटाचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. मात्र स्वत: फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. मात्र शपथविधीच्या काही वेळ आधीच भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पक्षाच्या आदेशानुसार आपण ही शपथ घेतली असल्याचं ट्वीट देखील फडणवीसांनी केलं.