मुंबई : नुकतेच तुरुंगातून सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना 'झेड प्लस' सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.


जयंत जाधव आणि पंकज भुजबळ यांनी काल मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आणि ही मागणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन छगन भुजबळ यांच्या जीविताला धोका असून त्यांना 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची विनंती केली.

काय लिहिलंय पत्रात?

"राज्याचे गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी टोळीयुद्धाचा बिमोड करण्यासाठी अनेक गुंडांवर कारवाया केल्या आहेत. यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. तरी त्यांना असलेली 'झेड प्लस' सुरक्षा पूर्ववत करण्यात यावी ही विनंती", असं पत्रात म्हटलं आहे.

भुजबळ सुटले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना 4 मे रोजी जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर आले.

मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वय लक्षात घेत जामीन मंजूर केला. भुजबळांना 5 लाखांचा जामीन मंजूर झाला. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ अटकेत होते. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केलं. त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी होती.

संबंधित बातम्या :

छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?  

छगन भुजबळांची चौकशी आणि अटकेचा संपूर्ण घटनाक्रम 

कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार? 

‘माझ्यावरील आरोप खोटे, दमानियांवर कायदेशीर कारवाई करु’, भुजबळांचं जेलमधून पत्र 

भुजबळ लढवय्ये, ते जेलबाहेर आले पाहिजेत: मंत्री दिलीप कांबळे