मुंबई : लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प असून याचा विपरित परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, राज्यात मुंबई, पुणे, जळगाव, मालेगाव, औरंगाबाद, पुणे येथे रुग्णसंख्या अधिक आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक व मालेगाव येथे संख्या अधिक आहे. मुंबई व पुण्यात संख्या अधिक असल्याची कारणे पाहिली तर दाटीवाटीची लोकवस्ती असलेल्या ठराविक ठिकाणी संख्या जास्त आहे. सोबतच मुंबई, पुण्यात महापालिका आणि शासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतला असून टेस्टिंग वाढवली असल्याने संख्या वाढत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
यावेळी ते म्हणाले की, 40 दिवसांपासून सगळं काही बंद आहे. कारखाने, व्यापार, व्यवहार बंद आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या, शासनाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार आहे. मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राज्य शासनाच्या अर्थकारणावर या संकटाचा विपरीत परिणाम होणार आहे. अनेकांचे रोजगार बुडाले, कारखाने-उद्योग बंद झालेत. महाराष्ट्र सरकारचा २०२०-२१ चा अर्थसंकल्प पाहिल्यास त्यात राज्याचे महसूल उत्पन्न हे 3 लक्ष 47 हजार कोटींच्या आसपास होते. पण आजची स्थिती पाहता या महसुलात तूट पडेल, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. ही महसुली तूट 1 लक्ष 40 हजार कोटी इतकी असेल. म्हणजे एकूण महसूलापैकी 40 टक्के उत्पन्न कमी होईल. याचा परिणाम राज्याच्या इतर विकासकामांवर देखील होऊ शकतो. मी पंतप्रधानांना यासंबंधी कल्पना दिली आहे. देशाच्या सगळ्या भागांवर हे आर्थिक संकट आहे. आपण सगळ्यांनी यावर चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे, असं आवाहनही यावेळी पवार यांनी केलं.
या महिन्यात बँकांना नऊ दिवस सुट्टी असल्याने बँका बंद असतील म्हणून घाईने तेथे गर्दी करण्याची गरज नाही. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलिस यंत्रणा, प्रशासन यंत्रणेवर हल्ले केल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यातून वेदना होतात. या यंत्रणांना आपण सहकार्य केलेच पाहिजे, असंही ते म्हणाले.
3 मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे. यानंतर लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास कोणीही रस्त्यांवर गर्दी करण्याची गरज नाही, पवार यांनी म्हटलं. 4 तारखेपासूनच्या नव्या गाइडलाइन्स सरकार लवकरच जाहीर करेल. त्यामुळे लॉकडाउन शिथिल केलं म्हणून लगेच सर्वांनी घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही. शासन ज्या काही सुचना करेल त्या कटाक्षानं पाळल्या पाहिजेत, असंही ते म्हणाले.
जनतेनेही यात जबाबदारी घेण्याची गरज आहे. देशातील संस्था व घटकांनी आपल्या नफ्यातील काही भाग देऊन गरजू व्यक्तींना मदत करण्याची गरज आहे. सहकारी संस्था या संबंधीची भूमिका घेतील याची खात्री आहे. संकटग्रस्त लोकांना अधिक सहकार्य करण्याची गरज आहे, असंही पवार म्हणाले.
लातूर भूकंपासारख्या घटनेचा विचार केला तर आपण आपत्ती निवारण कसे केले हे पाहण्यासाठी जागतिक बँक व अनेक लोक इथे भेटीसाठी आले होते. संकटावर धैर्याने मात करणे हा आपला इतिहास आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेतिहासाचे स्मरण करून आपण कामाला लागले पाहिजे. त्यात आपण यशस्वी होऊ ही मला खात्री आहे, असं देखील ते म्हणाले.
लॉकडाऊनमुळे राज्याच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होणार : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Apr 2020 02:48 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
त्यांनी देशभरात आर्थिक संकट उभं राहणार असल्याचं सांगत त्यासाठी एकत्रित चर्चेतून मार्ग काढला पाहिजे असं आवाहन यावेळी केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -