मुंबई : मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने आतापर्यंत अनेक मोठे आणि अनोख्या पद्धतीचा वापर करणाऱ्या तस्करांना पकडलं आहे. आता एनसीबीने मुंबईतून एका अशा ड्रग्जची विक्री करणाऱ्या तरुणीला अटक केली आहे, जी ड्रग्ज विकण्यासाठी चक्क एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरच नजर ठेवून होती. समीर वानखेडे कुठे जातात? काय करतात? आपल्याला पकडणार तर नाही ना? याच उद्देशाने तिने समीर वानखेडे यांच्यावर जागता पहारा ठेवला होता. इतकंच नाही तर दोन वेळा खबरी बनून स्वतः ती एनसीबी (NCB) ऑफीसला सुद्धा गेली होती आणि सचिन वानखेडे यांना भेटली होती.


एनसीबीनं ताब्यात घेतलेल्या तरुणीचं नाव इक्रा खुरेशी असून ती 21 वर्षांची आहे. एमडी ड्रग्स आणि गांजाची मोठ्या प्रमाणात ती विक्री करते. इक्रा कुरेशी मुंबईच्या डोंगरी परिसरात राहात असून डोंगरी परिसरात तिला लेडी डॉन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो गेल्या तीन महिन्यांपासून तिच्या शोधात होतं. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना हिची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना सुद्धा आपल्या प्रियकराच्या हातून तिने मारहाण करायला लावली होती. तिच्यावर डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चिंकू पठाण आणि एजाज सायको या दोन केसच्या तपासामध्ये इक्राचा शोध घेत होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने इक्रा खुरेशीला दीड लाखांच्या ड्रग्स सोबत अटक केली आहे. इक्रा चिंकु पठाणकडून ड्रग्स विकत घ्यायची आणि तिच्यासाठी काम करणाऱ्या पाच ते सहा महिला ड्रग्स पेडलर्सना ड्रग्स विकायची. चिंकू पठाण तिच व्यक्ती आहे, जी डोंगरीमध्ये एक ड्रग्सची फॅक्टरी चालवत होता आणि त्या फॅक्टरीचा संबंध दाऊदशी होता.


समीर वानखेडे यांच्यावर इक्रा कशासाठी आणि कधीपासून पाळत ठेवू लागली?


इक्राचा प्रियकर छोटूला काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्स सप्लाय करण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तेव्हा छोटूच्या चौकशीतून एनसीबी आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचेल अशी भीती इक्राला वाटू लागली, अटकेपासून वाचण्यासाठी इक्रा एनसीबी कार्यालयात येऊ लागली आणि अधिकाऱ्यांवर नजर ठेवू लागली. 


इक्राला हे चांगलच माहीत होतं की, एनसीबीची प्रत्येक कारवाई समीर वानखेडे यांच्याच नेतृत्वाखाली होते त्यामुळे समीर वानखेडे जर आपल्या कार्यालयातच असतील तर इक्राला अटक होणार नाही असा तिला विश्वास होता. यासाठी ती दोन वेळा एनसीबी ऑफिसला सुद्धा गेली आणि ड्रग्स संदर्भात काही माहिती द्यायची असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायचं कारण तिने सांगितलं. तिला कोणीही ओळखू नये म्हणून एनसीबी कार्यालयात जाताना इक्रा नेहमी बुरखा घालून जात होती. इक्राला जेव्हा एनसीबीने अटक केली आणि तिच्याकडे चौकशी केली, तेव्हा तिने चौकशीतून समीर वानखेडे यांच्यावर आपण पाळत ठेवलेल्याची गोष्ट तिने कबूल केली. 


इक्राचा ड्रग्स विकण्याचा मार्ग सुद्धा हायटेक होता. इंस्टाग्रामच्या माध्यमातून इक्रा ड्रग्स विक्री करायची. सोशल मीडियावर नवीन ग्राहक शोधून त्यांना आपल्याजवळ काम करत असलेल्या महिलांकडून ती ड्रग्स पुरवायची. इक्रा एक फोन चार ते पाच दिवस वापरायची आणि नंतर नवीन फोन घेऊन नवीन ग्राहक शोधायची. तपास यंत्रणांना कधी तिच्यावर संशयही येऊ नये आणि एनसीबीच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी तिने हा मार्ग स्विकारला होता. 


चिंकू पठाण आणि इजाज सायको यांच्या चौकशीतून इक्राच नाव समोर आलं होतं आणि याच कारणांमुळे गेल्या तीन महिन्यांपासून एनसीबी इक्रावर नजर ठेवून होती. शेवटी इक्राला एनसीबीने अटक केली असून कोर्टाने तिला पाच दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :