मुंबई : मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने आतापर्यंत अनेक मोठे आणि अनोख्या पद्धतीचा वापर करणाऱ्या तस्करांना पकलं आहे. आता एनसीबीने एका 21 वर्षीय तरुणीला मुंबईच्या डोंगरी परिसरातून अटक केली आहे, जी लोकांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवत असे. एनसीबीने तिच्याकडून दीड लाख रुपयांची रोकड आणि एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे.


एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांचं पथक मागील तीन महिन्यांपासून तिच्या मागावर होतं. पण दरवेळी ती पळ काढण्यास यशस्वी ठरत असे. एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं की, त्यांना या मुलीची माहिती होती, पण तिला पकडणं फार सोपं नव्हतं.


तपासादरम्यान समजलं की, ही तरुणी चिंकू पठाण गँगमधील लोकांसोबत काम करत होतं. अटक केलेल्या ड्रग्ज क्वीनचं नाव इकरा कुरैशी आहे आणि तिच्याकडे एमडी ड्रग्ज, एल एसडी आणि चरस मिळत होतं, ते देखील ग्राहकांच्या मागणीनुसार.


ड्रग्ज तस्करी कशी करायची?
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इकरा कुरेशी ड्रग्ज विकण्यासाठी अशा पद्धतीचा वापर केला होता की, तिला कोणी पकडू शकत नाही. इकरा ड्रग्ज विकण्यासाठी थेट इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत होती. इथे ती नव्या ग्राहकांशी संपर्क करायची आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करायची.


या तरुणीने ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी पाच ते सहा महिलांची निवड केली होती. ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांना ड्रग्जच्या डिलिव्हरीसाठी पाठवलं जात होतं.


एवढंच नाही अवघ्या 21 वर्षांच्या मुलीला माहित होतं की, तिच्यावर मोबाईल फोनद्वारेही नजर ठेवली जात आहे. त्यामुळे ती एका डिलिव्हरीसाठी एक मोबाईल फोनचा वापर करायची. खरंतह हे सिद्ध करणं एवढं सोपं नाही, पण एनसीबीच्या मते त्यांच्याकडे अनेक पुरावे आहेत.


आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, किंवा आपली माहिती कोणीतरी पोलिसांना देत आहे असं जेव्हा इकराला जाणवत असे तेव्हा ती ही बाब तातडीने तिच्या बॉयफ्रेण्डला देत असे. यानंतर तिचा बॉयफ्रेण्ड त्या व्यक्तीला धमकी द्यायचा. या धमक्यांमुळे त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेही दाखल झाले आहेत.