Nawab Malik : भाजप आता हतबल झालंय,दोन वर्षांनंतरही सरकार पाडता आलं नाही, आमदार खरेदीचा कार्यक्रमही इथे करता आला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी आज महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्ष पूर्ती निमित्त संवाद साधला. मलिक म्हणाले की, विरोधी पक्षाची गँग अयशस्वी झालीय. भाजपमध्ये आता चंद्रकांत पाटलांना हटवायचंय की देवेंद्र फडणवीसांना हटवायचंय? असा सवाल करत ते म्हणाले की, भाजपमध्ये अंतर्गत नवे विरुद्ध जुने वाद निर्माण झाला होता. फ्रॉड लोकांना सोबत घेऊन फडणवीस राजकारण करत होते. ज्यांना फडणविसांनी साईडलाईन केलं होतं असे तावडेंसारखे नेते आता केंद्रात मोठ्या पदावर गेले आहेत. यावरुन दिसतंय की साईड लाईन केलेल्यांना पुन्हा पुढे आणायचंय. त्यामुळे आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व काय तो निर्णय घेईल, असं नवाब मलिक म्हणाले.


Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज, ठाकरे सरकारला प्रत्युत्तर देण्यास अपयशी: सूत्र


नवाब मलिक म्हणाले की, पक्षातून गेलेल्यांच्या घरवापसीचा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. तावडेंचं तिकीट फडणवीस यांनी कापलं, त्यांचं केंद्रात पुनर्वसन केलं. भाजपमध्ये अजुनही खदखद सुरूय. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपतून अनेक नेते येतील, असंही ते म्हणाले. 


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दिल्ली हायकमांड नाराज


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दिल्ली हायकमांड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बी. एल.संतोष यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एबीपी माझा खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या योजना राज्यात नीटपणे पोहोचवल्या नसल्याने केंद्रीय नेतृत्व चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याचं समजतेय. महाविकास आघाडी सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यात चंद्रकांत पाटलांना अपयशी ठरल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय.


गेल्या काही दिवसात चंद्रकांत पाटील राज्य भाजपचं नेतृत्व करत असताना त्यांचा कारभार सर्वसमावेशक नसल्याच्या तक्रारी होत्या. हाच धागा पकडून काल झालेल्या तीन तासांच्या बैठकीत दिल्ली हायकमांडने चंद्रकांत पाटील यांची शाळा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील महा विकास आघाडी विरोधात रान उठवण्यात अपयश आल्याचेही भाजपच्या हायकमांडने निदर्शनास आणून दिले. येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कार्यपद्धतीत सुधारणा करावी अशा सूचनाही भाजपा हायकमांडने दिल्या आहेत. 


प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराजी नेमकी कशामुळे?
राज्य भाजपातील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव
पुणे आणि कोल्हापूर वगळता चंद्रकांत पाटील यांचा राज्यभर संघटनात्मक बांधणीसाठी फारसा प्रवास नाही
शंभर कोटी लसीकरण झाल्याबद्दल राज्य भाजपमध्ये फारसे कार्यक्रम झाले नाहीत
देगलूर बिलोली मतदारसंघात भाजपला मोठ्या फरकाने आलेलं अपयश
आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम राज्यात नीटपणे राबवला नाही
नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय राजकीय जीवनाची २० वर्षे या कार्यक्रमाची ही नीट आखणी झाली नाही.


याबद्दल केंद्रीय नेतृत्व चंद्रकांत पाटील यांच्या कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी अशा सूचनाही केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती आहे.