भिवंडी : महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल भिवंडीत घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुसलमान बांधवांना डोकं शांत ठेवण्यासाठी पानसुपारी, पानमसाला खाण्याचा अजब सल्ला  दिला. जितेंद्र आव्हाड यांनी मुस्लिम बांधवांना विनंती करत आपलं डोकं शांत ठेवा. जास्त मांस खाऊन डोकं गरम करू नका. तुमचं डोकं शांत ठेवा. तुमच्या विरोधकांना हेच हवे आहे की तुमचं डोकं गरम व्हावं. परंतु तुम्ही शांत राहा, डोक्यावर बर्फ ठेवा, असं आव्हाड म्हणाले. तोंडात पान, सुपारी, पानमसाला जे हवं ते ठेवा परंतू डोकं शांत ठेवा असा सल्ला त्यांनी दिला.  


भिवंडी शहरातील जकात नाका परिसरात कोणार्क बिल्डिंगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष शोएब खान गुड्डू यांच्या कार्यालयाचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील  उपस्थित होते. या दरम्यान कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता. तसेच कलम 144 चे उल्लंघन देखील या ठिकाणी झाल्याने निजामपूर पोलिस ठाण्यात आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यावेळी एसटी संपाबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, एक नेता असा बोलला की शरद पवार का मध्ये पडतात? त्यांच्या घरी का बैठका होतात. गेल्या 40 वर्षांपासून एसटी कर्मचार्‍यांच्या जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले. तसेच ऊसतोड कामगारांचा संप झाला त्यावेळी मुंडे साहेब ऊसतोड कामगारांच्या मागण्या घेऊन पवार साहेबांकडे यायचे व पवार साहेब त्यांचे प्रश्न देखील मिटवायचे, असं आव्हाड म्हणाले. 


आव्हाड म्हणाले की, बिडी कामगारांचा संप झाला त्यावेळी देखील नरसय्या आडम व शरद पवार बसून प्रश्न सोडवायचे. परंतु उगाचच काही नेत्यांनी शरद पवारांवर आक्षेप घेतला आणि त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोललो, असं ते म्हणाले.  काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम केलं. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे जवळपास सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या असून फक्त विलीनीकरणाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे, असं ते म्हणाले.