मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी (Mumbai Cruise Drug Case) एक मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यांनी या सर्व प्रकरणामागे भाजप नेते मोहित कंबोज (Mohi Kamboj) यांचा हात असल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर कंबोज यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा टाकला होता. याप्रकरणी मलिक यांना नुकताच 15 हजारांचा वैयक्तिक जामीन कोर्टाने मंजूर केला आहे.
जामीन मंजूर झाल्यामुळे नवाब मलिकांना मानहानीच्या प्रकरणातून अखेर दिलासा मिळाला आहे. माझगाव कोर्टाकडून हा 15 हजारांचा वैयक्तिक जामीन मलिकांना मंजूर झाला आहे. तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहितीही कोर्टाने दिली आहे.
काय म्हणाले मलिक?
कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर बोलताना मलिक म्हणाले, ''माझ्यावर एक मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. याबाबतचं समन्स मिळाल्यानंतर मी आज कोर्टात हजर झालो होतो. यावेळी मला कोर्टाने विचारलं की, मी मोहित कंबोज यांची बदनामी करत आहे. त्यावेळी मी कोर्टाला अशाप्रकारे कोणाची बदनामी करत नसून केवळ सत्य समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मी कोणत्याही प्रकारे कोर्टाचे आदेश न धुडकावता बोलत आहे.''
नेमकं प्रकरण काय?
मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अनेक नवे खुलासे होत आहेत. दरम्यान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा स्वतः तिकीट काढून क्रूझवर गेला नव्हता, तर आर्यन क्रूझवर यावा म्हणून भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मेहुण्यानं षडयंत्र रचलं होतं, असा आरोप मलिकांनी केला होता. मलिकांच्या या खळबळजनक आरोपांनंतर मोहित कंबोज यांनी मलिकांवर मानहानीचा दावा ठोकला होता. दरम्यान आता या प्रकरणी मलिकांना जामीन मंजूर झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर, नवाब मलिकांचा मोठा आरोप
- क्रुझ पार्टीतील 'त्या' तीन लोकांना सोडण्यातच सर्वात मोठा खेळ; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट
- नवाब मलिकांकडून ऑडियो क्लिप ट्वीट, सॅनविल आणि NCB अधिकाऱ्यातील संवाद, नेमकं काय आहे त्यात...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha