Nawab Malik Bail Hearing Updates : नवाब मलिकांच्या (Nawab Malik ) जामिनावर तातडीनं सुनावणी हवी असल्यास ते खरंच आजारी आहेत हे आधी आम्हाला पटवून द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिले आहेत. अन्यथा तुम्हाला वाट पाहावी लागेल कारण तुमच्या आधी आलेली बरीच प्रकरण अद्याप प्रलंबित आहेत, अशी स्पष्ट भूमिका न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी मंगळवारी व्यक्त केली. नवाब मलिकांच्या जामीन अर्जाला ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी जोरदार विरोध केला. मलिक हे पीएमएलए कायद्यातील कलम 45 मधील तरतुदीनुसार आजारी नाहीत असा दावा करण्यात आलं आहे. यावर हायकोर्टानं नवाब मलिकांच्या जामीनावरील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब करत 21 फेब्रुवारीच्या सुनावणीत दोन्ही बाजूंच्या वकिलांना केवळ मलिकांच्या वैद्यकीय स्थितीवर युक्तीवाद करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवाब मलिकांवर उपचार सुरु
सुनावणी दरम्यान सांगण्यात आलं की, नवाब मलिकांची एक किडनी निकामी झालीय आणि ते सध्या एकाच किडनीवर आहेत. मात्र तरीही ईडी त्यांच्या रूग्णालयातील डिस्चार्जसाठी घाई करत आहे, असा दावा त्यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी केला. नवाब मलिक हे गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ला येथील क्रिटी केअर रूग्णालयामध्ये दाखल आहेत. मात्र किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना अन्य मोठ्या रूग्णालयात उपचार सुरू करायचे आहेत, अशी माहिती त्यांनी हायकोर्टाला दिली. तसेच न्यायमूर्ती कर्णिक यांनी अनिल देशमुखांना याच धर्तीवर जामीन दिल्याचा दाखला दिला. मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्देशांनुसार मलिकांची सरकारी वकिलांकडून चाचणी पूर्ण झाली असून तो अहवाल कोर्टात प्रलंबित आहे, त्यावरही विशेष कोर्टात लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.
आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवाब मलिक अटकेत
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं मलिक यांचा अर्ज नुकताच फेटाळून लावल्यानंतर त्या निर्णयाला मलिकांकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर मंगळवारी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे सुनावणी झाली. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ‘ईडी’नं कारवाई करत मलिकांना मनी लाँड्रिंग प्रकरणी 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती.
जामीन नाकारताना सत्र न्यायालयाचं निरीक्षण
मुनिरा प्लंबर आणि आई यांच्या मालकी असलेल्या कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड येथील मालमत्ता मलिक यांनी जवळपास दोन दशकांपूर्वी खरेदी केली होती. मात्र दाऊदची मुंबईतील हस्तक आणि बहिण हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांनी ही जमीन धमकावून हस्तगत केली होती. मलिकांना ही माहिती असूनही त्यांनी जाणीवपूर्वक हा व्यवहार केला. मलिक यांनी प्लंबरकडे जागेबाबत कोणतीही चौकशी अथवा तथ्यांची पडताळणीही केली नाही, हे साक्षीदारांनी दिलेल्या जाबाबांवरून सिद्ध होत आहे. मलिक यांनी वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन जामिनासाठी अर्ज केला होता. तेव्हा, ईडीनं मलिक यांचे वैद्यकीय चाचणीचे अहवाल मागितले होते. मात्र, ईडीच्या मागणीला मलिक यांनी विरोध केला. मलिक हे गंभीररित्या आजारी असतील तर त्यांनी स्वतःहून तपासयंत्रणेला अहवाल देणं आवश्यक होतं. मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल सादर न केल्यामुळे तसेच वैद्यकीय मंडळानं मलिक यांची तपासणी न केल्यामुळे हा जामीन अर्ज फेटाळण्यात येत आल्याचं विशेष न्यायालयानं आपल्या आदेशात नमूद केलेलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :