मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईवर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नवाब मलिक यांनी आता समीर वानखेडे यांची बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केलेत. कोरोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकंही तिथं उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. नवाब मलिक यांनी मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य जास्मिन वानखेडे उपस्थित असल्याचा दाखला दिलाय.
कोण आहेत जास्मिन वानखेडे?जास्मिन वानखेडे मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकारी असून व्यवसायाने वकील आहेत. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या त्या भगिनी आहेत.
नवाब मलिक यांना मनसेचं प्रत्युत्तर यापूर्वी, नवाब मलिक यांनी आरोप केला होता की जास्मिन वानखेडेंच्या माध्यमातून मनसे चित्रपट सेना खंडणी गोळा करते. यास आता मनसेनं प्रत्युत्तर दिलं आहे. मलिक यांनी जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यापुढे जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेले बिनबुडाचे आरोप खपवून घेणार नाही, असा थेट इशारा दिलाय. मनसे चित्रपट सेना जास्मिन वानखेडे यांच्या पाठिशी उभी आहे. समीर वानखेडे हे जे काम करतायेत त्याचा आम्हाला अभिमानच आहे. त्यांच्या पाठिशीही मनसे चित्रपट सेना उभी राहील. असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलंय. तर, "फक्त राष्ट्रवादीच नाही तर महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे पदाधिकारी चित्रपटाच्या सेटवर जाऊन काय करतात हे पुढे आणू" असा इशारा मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिलाय. राष्ट्रवादीनं मनसेवर केलेल्या आरोपांना प्रत्त्युत्तत देताना यापुढे ज्या-ज्या सेटवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाऊन पैसे गोळा करतात त्याची यादी देतो. त्यांच्यावर कारवाई करा, असं आव्हानच खोपकर यांनी दिलं आहे.
जास्मिन वानखेडेंचं मलिकांना प्रत्युत्तरनवाब मलिक यांनी मालदिव आणि दुबईतील वानखेडे परिवाराच्या वास्तत्वाचा दाखला देत तिथे तडजोडी केल्याचा आरोप केलाय. यावर जास्मिन वानखेडे यांनी पलटवार करत मी नवाब मलिक यांचं ऑस्ट्रेलिया कनेक्शन काढू का? असा सवाल केलाय. ऑस्ट्रेलियावर आता जास्त बोलणार नाही वेळ आली की नक्की बोलेन, असंही त्या म्हणाल्या. तसेच ऑस्ट्रेलियाबद्दल नवाब मलिक यांना विचारा ते सांगतील, असंही जास्मिन यांनी म्हटलं आहे.