Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची दाट शक्यता आहे. राणा यांच्या दाऊद कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गु्न्हे अन्वेषण विभागाकडे (EOW) करण्यात येणार असल्याची माहिती आहे. नवनीत राणा यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळची व्यक्ती समजली जाणारी युसूफ लकडावालाकडून 80 लाखांचे कर्ज घेतले होते. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या EOW कडे चौकशी करण्यात येणार आहे.
युसूफ लकडावाला हे डी गँगशी संबंधित हे नाव असून त्याच्याकडून नवनीत राणांनी हे 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी राणा यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्राचा दाखला देत हे आरोप केले आहेत. हा मुद्दा आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी या प्रकरणाचा तपास करणार का असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून राणा दाम्पत्य आणि डी गॅंगच्या संबंधाबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीकडून मुंबई पोलिसांकडे याबाबत लवकरच तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर EOW कडून चौकशी सुरू करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या EOW कडून आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी सुरू आहे.
युसूफ लकडावालाचे दाऊदशी संबंध असल्याचं आणि तो डी गँगचा फायनान्सर असल्याचं सांगितलं जायचं. मनी लॉन्ड्रिंगसह पैशाच्या अफरातफरीच्या प्रकरणात ईडीनं त्याला अटक केली होती. कॅन्सरग्रस्त असल्यानं आर्थर रोड कारागृहात त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला होता. याबाबतचे एक पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले होते. नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांवर हे आरोप करणे भोवणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना आदराची वागणूक देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे नवनीत राणा यांचा 'दलित कार्ड'चा प्लॅन फेल झाला असल्याची चर्चा सुरू आहे. आता मुंबई पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी नवनीत राणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.