नवी मुंबई : शाळेत खेळताना पायाला काच लागून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नवी मुंबईत समोर आला आहे. कळंबोलीतील सुधागड शाळेत शिकणारा 10 वर्षांचा जमील खान शाळेतील 'स्पोर्ट्स डे'ला खेळताना जखमी झाला होता.
गेल्या आठवड्यात पायाला काच लागून जखमी झाल्यानंतर योग्य उपचार न झाल्यामुळे जमीलचा मृत्यू झाला. याला शाळा प्रशासन आणि डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विशेष म्हणजे शाळेच्या मैदानात आताही बिअरच्या बाटल्या पडल्याचं दिसत आहे.
कळंबोली सेक्टर 12 मध्ये राहणारा जमील खान हा सुधागड संस्थेच्या उर्दू शाळेत चौथीत होता. शाळेत 1 जानेवारीला आयोजित 'स्पोर्ट्स डे'ला शाळेच्या मैदानात पळताना त्याच्या डाव्या पायात काच लागली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
जमीलला कळंबोलीतील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आलं. प्राथमिक उपचारांनंतर जमील खानला घरी सोडण्यात आलं. चार दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते, मात्र त्याचा पाय सुजलेला होता. अखेर आठवड्यानंतर जमीलचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जमीलवर योग्यरित्या उपचार न करणारे डॉक्टर आणि मैदान साफ न करणारे शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप जमीलच्या नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मात्र जमीलवर वेळेत उपचार झाल्याचा दावा केला आहे. शाळेचं मैदान स्वच्छ ठेवण्यात येत असून त्याच्या पायाला बारीक काच लागल्याचं ते म्हणाले. शाळेकडून मैदान साफ असल्याचा दावा करण्यात आला असला तरी मैदानावर बिअरच्या बाटल्या अजूनही पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जमीलच्या मृत्यूला कोण जबाबदार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहतो.
शाळेत खेळताना पायाला काच लागून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
09 Jan 2019 06:39 AM (IST)
नवी मुंबईतील सुधागड शाळेत चौथीत शिकणारा जमील खान हा चिमुरडा शाळेत स्पोर्ट्स डेला खेळताना पायाला काच लागून जखमी झाला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -