मुंबई : मुंबईतील लोअर परेलचा रेल्वे पूल आजपासून वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी बंद केल्याने त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. लोअर परेल रेल्वे पुलाजवळ नागरिकांची गर्दी झाली असून गोंधळाचं वातावरण आहे. गर्दीमुळे प्रवाशांचा आरडाओरडा सुरु आहे.


लोअर परेल स्थानकातून बाहेर पडण्यासाठी फक्त एक पूल उपलब्ध आहे, पण तो लहान आहे. पूल उतरल्यावर खाली चिंचोळी गल्ली आहे, त्यातच रस्त्यावर बाईक पार्क असतात. तिथून बाहेर पडायला प्रवाशांना 20 ते 25 मिनिट लागत आहेत.

रेल्वे पूल करण्याआधी प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचं तसंच पर्यायी रस्ता उपलब्ध करुन दिला नसल्याचं यावरुन दिसत आहे. महापालिका काय करत आहे, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

या पुलाच्या दुरुस्तीचं काम आजपासून (24 जुलै) सुरु झालं आहे. त्यामुळे दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत पूल बंद राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडू सांगण्यात आलं आहे.

मुंबईतील अंधेरीच्या गोखले पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर रेल्व प्रशासन, आयआयटी मुंबई आणि महापालिका अधिकारी यांनी केलेल्या सेफ्टी ऑडिटनंतर, लोअर परेल रेल्वे ब्रिज धोकादायक असून तो तात्काळ बंद करण्यात, यावा असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षतेसाठी लोअर परेल रेल्वे ब्रिज (ना. म. जोशी मार्ग) हा वाहनांना वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना बंद करण्यात आला आहे.