नवी मुंबई : नवी मुंबईमधील तळोजा जेलमध्ये कैद्यांची मैफील आयोजित करण्यात आली होती. यात कैद्यांनी आपले कलागुण सादर करत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. कैद्यांसोबत पोलिसांनीही सुरात सूर मिसळून ठेका धरला. कुख्यात डॉन अबू सालेमही तळोजा जेलमध्ये आहे.
गाण्यांचे सूर, मटक्यावर वादन, तबल्यावर थाप, अँकरिंग हा मैफिलीचा नजारा तळोजा जेलमध्ये पहायला मिळाला. सादरीकरण पाहून हा कोणत्या कलाकारांचा ऑर्केस्ट्रा आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नव्हता. मात्र हे कलाकार प्रत्यक्ष जेलमधील कैदी होते.
कोणी 'रंग दे बसंती शोला' यासारखी देशभक्तीपर गीतं गायली, तर कोणी भक्तीगीतं. कोणी वाद्य वाजवून आपली कला दाखवली. यावेळी कैद्यांचा उत्साह पाहून मैफील चांगलीच रंगली होती. गाणारे, नाचणारे आणि ऐकणारेही कैदी होते. जेलमधील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आपल्यातील सुरांना वाट मोकळी करून दिली.
तळोजा जेलमध्ये 2500 कैदी आहेत. वर्षभर या कैद्यांसाठी तळोजा जेल प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात. योगा, मनोचिकिस्ता, वैद्यकीय तपासणी, मैफील आदी उपक्रम राबवले जातात. यामुळे कैद्यांची मानसिक स्थिती सुधारुन त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन होण्यास मदत होत असल्याचे जेलरकडून सांगण्यात आले.
सध्या तळोजा जेलमध्ये कच्या कैद्यांबरोबर अनेक गँगचे पक्के कैदी आहेत. बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अबू सालेम, याशिवाय काही नक्षलवादी आहेत. कैद्यांच्या तुलनेत सध्या अधिकारी, कर्मचारी यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे याबाबत निवेदन करुन मागणी करणार असल्याचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.