नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ परिसरात 30 लाख रुपये किमतीची एक किलो एमडी मेफेड्रोन पावडर जप्त करण्यात आली आहे. मेफेड्रोन विकणाऱ्या महिलेलाही नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे.


अझीथा बेगम अब्दुल मुथलिफ असं अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एलपी बसस्टॉपपासून 50 मीटर अंतरावर सायन-पनवेल महामार्गाच्या पदपथावरुन तिला अटक करण्यात आली.

नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी 8 वाजता सापळा रचून महिलेला अटक करण्यात आली. तिची झडती घेतल्यावर प्लास्टिकच्या पिशवीत 30 लाख रुपये किमतीची एक किलो वजनाची एमडी पावडर हस्तगत करण्यात आली.

नेरुळ पोलीस ठाण्यात या महिलेच्या विरोधात एनडीपीएस कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.