नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात नवी मुंबई महापालिकेने अविश्वास ठराव पारित केल्यापासून तुकाराम मुंढे चर्चेत होते. त्यांची बदलीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महापालिकेच्या सभागृहात अविश्वास ठरावही मंजूर केला होता.
तसेच नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुंढे यांच्या बदलीची मागणी केली होती. पण मुख्यमंत्री यांनी त्यांची बदली टाळली होती. अखेर आज त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता रामास्वामी एन. हे नवे पालिका आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत.
अवैध बांधकामाबाबत उच्च न्यायालयामध्ये मुंढे यांनी राज्य सरकारविरुद्ध मांडलेली भूमिका त्यांना भोवली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
दरम्यान, तुकाराम मुढें यांच्यासोबत इतरही दोन आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. भंडाऱ्याचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची भंडाऱ्याच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, 25 ऑक्टोबर 2016 रोजी तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंढेंवर 105 विरुद्ध 6 असा अविश्वास ठराव मंजूर केला होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या अविश्वास ठरावाच्या बाजने मतदान केलं होतं. तर भाजपने मुंढेंच्या बाजूने मतदान केलं.
महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, असं आरोप तेव्हा त्यांच्यावर करण्यात आले होते.
मात्र, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मुंढे यांची बदली केलेली नव्हती.
संबंधित बातम्या: