सर्जिकल स्ट्राईकनंतर मुंबईतील सुरक्षेत वाढ, ड्रोन, पॅराग्लायडरवर बंदी
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2016 08:17 AM (IST)
मुंबई : दिवाळीआधी मुंबईवर दहशतवादी हवाई हल्ला करु शकतात, अशी शक्यता मुंबई पोलिसांनी व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रभर सणासुदीचं वातावरण असताना, दहशतवादी हवाई हल्ला करण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी व्यक्त केली आहे. पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोन किंवा हवाई क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून मुंबईवर हल्ले करण्याची शक्यता आहे. असा हल्ला झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळात पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोन यांवर मुंबई आणि परिसरात बंदी घालण्यात आली आहे. अशी उपकरणं मुंबई परिसरात दिसल्यास पोलिसांकडून कडक करावाई केली जाणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणांकडून मुंबईच्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या प्रत्येक एअरक्राफ्टवर नजर ठेवली जात आहे. ड्रोन असणाऱ्यांची आणि ड्रोनची विक्री करणाऱ्यांची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून गोळा केली जात आहे. संबंधित बातम्या : 22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा धुळ्याचा जवान पाकच्या ताब्यात, बातमी समजताच आजीचा मृत्यू