नवी मुंबई : शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेल्या बस भाडेवाढ प्रकरणावरुन पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढेंविरोधात पुण्यातही आंदोलनं सुरु झाली आहेत. या सर्व प्रकरणावरुन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनीही तुकाराम मुंढेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
पीएमपीएमएमलच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सांभाळण्याआधी तुकाराम मुंढे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. तेव्हाही लोकप्रतिनिधींनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडला होता.
लोकप्रतिनिधींना तुच्छ समजणे, सभागृहाने घेतलेले निर्णय डावलणे, स्वत:ला काहीतरी विशेष समजत मनमानी निर्णय घेणे, काम न करता फक्त मीडियामध्ये चमकणे, एवढंच तुकाराम मुंढेंना जमतं, अशी टीका नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी केली. शिवाय, एका चांगला अधिकारी अहंकारामुळे वाया जात असल्याचेही सुधाकर सोनवणे यांनी म्हटले आहे.
नवी मुंबईनंतर पुण्यातील लोकप्रतिनिधी तुकाराम मुंढेंच्या मनमानी कारभाराला कंटाळून मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहेत. पुण्यामध्ये सत्ताधारी भाजपची एकहाती सत्ता आहे.
"विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांच्याकडे परिवहन विभाग असल्याने त्यांचा रोज पालिकेतील लोकप्रतिनिधींशी संपर्क येत नाही. तरीही पुण्याचे महापौर त्यांच्या बदलीची मागणी करीत आहेत. हे पाहिले तर नवी मुंबईच्या प्रतिनिधींनी त्यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्तावाप्रकरणी चुकले काय?", असा सवालही महापौर सुधाकर सोनवणेंनी उपस्थित केला आहे.