नवी मुंबई : पोलिस अधिकारी असल्याचं सांगून लोकांना लुबाडणाऱ्या 30 वर्षीय महिलेला नवी मुंबईच्या कोपरखैराणे पोलिसांनी अटक केली आहे. भक्ती उर्फ सारिका शिंदे असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे.
तोतया पोलिस निरीक्षक असल्याचं सांगून या महिलेने अनेकांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. तपासादरम्यान आरोपी महिलेकडून पोलिसांच्या बनावट ओळखपत्रासह इतर कागदपत्र जप्त करण्यात आली आहे.
आरोपी महिला ही मूळची पुण्यातील जुन्नरमधील आहे. ठाणे शहर पोलिस स्टेशनमध्ये निरीक्षक पदावर कार्यरत असल्याचं भासवून मागील चार ते पाच वर्षांपासून लोकांची फसवणूक करत आहे.
लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपी भक्तीने पोलिस अधिकारी तसंच सेलिब्रिटींसोबत स्वतःचे फोटो काढले. मात्र तिची ही शक्कल तिला अटक होण्यापासून वाचवू शकली नाही. कोपरखैराणे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे.