नवी मुंबई : नवी मुंबईतील इंजिनिअर तरुणाची हत्या केल्याप्रकरणी डबेवाल्यासह तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एल अँड टी कंपनीत कार्यरत असलेल्या दीपन बॅनर्जीची 2010 साली हत्या करण्यात आली होती. ठाणे जिल्हा कोर्टाने मंगळवारी तीन आरोपींना शिक्षा सुनावली.


दीपनला डबा पुरवणारा डबेवाला विनोद बांदलने त्याला लुटण्याचा प्लान आखला होता. विनोदने आपले सहकारी सुरज गुरव आणि संतोष राऊत यांनाही दीपनला लुटण्याच्या कटात सहभागी करुन घेतलं. मात्र याची अखेर दीपनच्या हत्येत झाली.

जज एच एम पटवर्धन यांनी शिक्षा सुनावताच दीपनच्या मोठ्या बहिणीला अश्रू अनावर झाले. मात्र तिन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता.

ऑगस्ट 2010 मध्ये 23 वर्षीय दीपनची ऐरोलीतील राहत्या घरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. लुटीच्या उद्देशाने तिघे आरोपी दीपनच्या घरात घुसले होते.

दीपनला भरघोस पगाराची नोकरी असल्याच्या समजातून त्यांनी लुटीचा डाव आखला. त्याच्या घरी भरपूर पैसा असेल, असा त्यांचा समज होता, मात्र त्यांना अडीचशे रुपयेच कॅश मिळाली. त्याशिवाय कॅमेरा, लॅपटॉप, क्रेडीट-डेबिट कार्ड आणि मोबाईल चार्जर या वस्तू त्यांनी चोरल्या. कमी रक्कम मिळाल्यामुळे तिघांनी दीपनला भोसकून मारलं.

कलम 302 (हत्या), 394 (चोरी करताना एखाद्याला मुद्दामहून केलेली दुखापत), 397 (मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने चोरी किंवा दरोडा) यासारख्या कलमांअंतर्गत आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली.

नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या चारच दिवसात आरोपींना अटक केली होती. त्याचप्रमाणे तिघांकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला होता. कोर्टात 41 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी सहा जणांनी साक्ष बदलली.

नवी मुंबई पोलिसांनी दीपनच्या घरातील कपाटावरुन दोघांचे फिंगरप्रिंट्स मिळवले होते. त्याचप्रमाणे चोरीचा मालही सापडला होता. गुन्ह्यात थेट सहभाग नसल्यामुळे चोरीचा माल ठेवणाऱ्या दोघांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली.

इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या दीपनने कोलकात्याच्या कॉलेजमधून तिसरा क्रमांक मिळवला होता. पदवीनंतर त्याला लगेच एल अँड टी कंपनीत नोकरी मिळाली आणि तो नवी मुंबईत स्थायिक झाला.