नवी मुंबई : झाडांवर अळ्या, भिंतींवर अळ्या, एवढंच काय हवेत अळ्या, नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात अळ्यांनी उच्छाद मांडला आहे. रेल्वे स्टेशन ते सेक्टर 50 कडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र अळ्या दिसत आहेत. रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर या अळ्या पडत आहेत. त्यामुळे अचानक शरीराला खाज सुटते आणि लाल डाग पडतात.


परिसरातील अनेक झाडांवर या किड्यांनी बस्तान बसवलं आहे. त्यामुळे या अळ्या अंगावर पडत असल्याने दुचाकीस्वारांच्या अपघाताची शक्यता बळावली आहे. या परिसरातील नागरिकांनी तसंच लोकप्रतिनिधींनी महापालिकेकडे याबाबत तक्रारही केली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराची पाहणी केली.

नवी मुंबईत सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरु आहे. याच बदलत्या वातावरणामुळे सीवूड्समध्ये अचानक अळ्यांची संख्या वाढल्याचं बोललं जात आहे. या अळ्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची गरज आहे. अन्यथा या अळ्या नवी मुंबईकरांच्या घरादारात कधी घुसल्या कळणारही नाही.