नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूरमध्ये एका बारबालेची पोटात चाकू खुपसून हत्या करण्यात आली आहे. कविता विश्वास असं हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 32 वर्षीय महिलेचं नाव आहे. आरोपी राहुल फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
बेलापुरातल्या आग्रोळी गावातील विनोद बारमध्ये कविता काम करत होती. अनेक वर्षांपासून तिचे राहुल बंगाली या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दीड वर्षांपासून ते एकत्र राहत होते, मात्र एक महिन्यापूर्वी त्यांच्यात काही वाद झाल्यानं ते वेगळे झाले.
सोमवारी संध्याकाळी राहुलनं बारमध्ये येऊन कविताशी भांडण उकरुन काढलं. वाद विकोपाला गेल्यावर त्यानं सुरा काढून थेट तिच्या पोटात खुपसला. यात गंभीर जखमी झालेल्या कविताला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र अतिरक्तस्त्रावानं तिचा मृत्यू झाला.