नवी मुंबई : बाजार समिती 100 टक्के नियंत्रणमुक्तीसाठी 27 नोव्हेंबरला एपीएमसी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि माथाडी संघटनेने घेतला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी गेल्या वर्षी नियमन मुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.
मात्र या निर्णयामुळे शेतमाल बाजार समितीमध्ये न येता थेट मुंबईत जाण्यास वाव मिळावा, असा सरकारचा उद्देश होता. यामध्ये बाहेरील व्यापाऱ्यांना करातून सूट आणि एपीएमसीमधील व्यापाऱ्यांवर करबोजा टाकल्याचा आरोप एपीएमसीमधील व्यापारी करीत आहेत.
एपीएमसीमध्ये कृषी माल येणे कमी झाल्याने माथाडींचेही मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर एपीएमसी पूर्णत: नियंत्रण मुक्त करावं, यासाठी येत्या 27 तारखेला पाचही बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज मंत्रालयात पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने हा बंद पुकारण्यात आला आहे.