नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला नाव कुणाचं द्यायचं? यावरुन सध्या वाद पेटला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून आज , 24 जूनला सिडकोला 1 लाख लोकांचं घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. 


उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं पोलिस प्रशासनानं काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे नवी मुंबईतील महत्त्वाचे रस्ते आणि वाहतूकीत बदल करण्यात आला  आहे. नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. यामुळं पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल होणार आहेत. 




विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी नवी मुंबई, उरण आणि पनवेलमधील प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. आज 24 जूनला नवी मुंबई व परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळं नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. आज नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.  मुंबईहून पुण्याकडे तसेच पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. वाशी टोल नाका, वाशी गाव, पाम बीच मार्ग शिळ फाटा या मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. 




तसेच एरोली टोल नाका, रबाळे, शीळफाटा, कळंबोली या मार्गाने देखील पुण्याकडे जाता येईल. दरम्यान गोव्याला जाणारे वाहने देखील नवी मुंबई शहरातील हायवे वरून न जाता, जेएनपीटी रोड व जुना मुंबई - पुणे हायवेवरून जाणार आहेत. ठाणे -बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. तर कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल. तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.