नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं? यावरुन सध्या वाद पेटला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील (Di Ba Patil)यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून आज नवी मुंबईतील सिडकोवर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनास सुरुवात करण्याआधी आंदोलक नेत्यांकडून दि बा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आंदोलनास सुरुवात करण्यात आली.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) दि. बा. पाटील (D B Patil) यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील याचं नाव देण्यासाठी स्थानिकांचा एल्गार नवी मुंबईत पाहायला मिळाला. यावेळी स्थानिक भूमिपुत्रांकडून सिडको प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. येत्या 15 ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव मिळालं नाही तर 16 तारखेपासून विमानतळाचं काम बंद पाडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. 


Navi Mumbai Airport Name Row : ... अन्यथा 16 ऑगस्टपासून विमानतळाचं काम बंद पाडू, आंदोलकांचा इशारा


आंदोलनासाठी नवी मुंबईत बंद केलेली वाहतूक सुरु
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल-शीव महामार्गावर रोडपाली ते बेलापूर अशी वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या वाहतूक कोंडीला सर्वसामान्यांना सामोरं जावं लागलं. नवी मुंबईत काही ठिकाणी यामुळं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला होता. मुंबईहून पुण्याकडे तसेच पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आला होता. वाशी टोल नाका, वाशी गाव, पाम बीच मार्ग शिळ फाटा या मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती. मात्र आता आंदोलनामुळे नवी मुंबई शहरातील बंद करण्यात आलेली वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सर्व मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली असून नवी मुंबई वाहतूक पोलीसांकडून वाहतूक सुरू केल्याची घोषणा करण्यात आली आहे. 


D B Patil Family : पहिल्यांदाच दि.बा.पाटलांचा परिवार ABP माझावर, विमानतळाच्या नामकरणाबाबत म्हणाले...


सिडको अधिकाऱ्यांना निवेदन  
विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी सिडकोला घेराव घातला. मोठ्या संख्येने आंदोलक आणि भूमिपुत्र सिडको ऑफिस परिसरात आले. आंदोलकांनी शांतपणे आंदोलन केलं. या आंदोलनात नवी मुंबई, पनवेल, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली अशी विविध ठिकाणहून आंदोलक सहभागी झाले. यावेळी सिडको अधिकाऱ्यांना आंदोलकांकडून एक निवेदन देण्यात आलं. 'विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव द्यावे', असे निवेदनात म्हटलं आहे. तसंच 15 ऑगस्टपर्यंत विमानतळाला दिबांचे नाव नक्की करा अन्यथा 16 ऑगस्टपासून विमानतळाचे काम चालू देणार नाही', असा इशारा कृती समितीतील आंदोलकांनी दिला आहे. 


Navi Mumbai Airport Name Row: मनसे आ. राजू पाटील आंदोलनात सहभागी; राज ठाकरेंच्या भूमिकेवर म्हणाले...


दि बा पाटील यांच्या परिवाराचं काय आहे म्हणणं
दि बा पाटील यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असूनही आज त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य राजकारणात नाही. विमानतळ नामकरणाच्या पार्श्वभूमीवर दि बा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांच्याशी एबीपी माझा डिजिटलनं संवाद साधला. यावेळी विमानतळाच्या नामकरणाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, विमानतळाला दिबांचं नाव लागलं तर आम्हाला निश्चितच आनंद होईल. आम्हाला अशी खात्री आहे की, त्यांचं नाव विमानतळाला लागेलच. दिबा पाटील यांच्या नावाखातर लोकं आंदोलनात उस्फुर्तपणे उतरत आहेत. मला हे आंदोलन पाहून 1984 च्या आंदोलनाची आठवण झाली. 10 तारखेच्या आंदोलनात देखील मोठ्या प्रमाणात लोकं रस्त्यावर उतरली होती. या लोकांमध्ये सर्व वयोगटातील लोकं होती. प्रामुख्यानं यात तरुण वर्ग अधिक प्रमाणात होती. या मुलांनी तर दिबा पाटील यांना पाहिलंही नाही पण त्यांची तीव्र भावना आहे की दिबांचं नाव विमानतळाला दिलं जावं, असं ते म्हणाले.