नवी मुंबई : खारघरमधील रिक्षाचालकांचा संप आठव्या दिवशीही सुरु आहे. हद्दीच्या वादावरुन खारघार आणि तळोजातील रिक्षाचालकांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर चालक संपावर गेले आहेत.


परंतु रिक्षाचालकांच्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. आठ दिवसांपासून रिक्षा बंद असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मागील आठवड्यात मंगळवारी (21 नोव्हेंबर) खारघर रेल्वे स्थानकावर रिक्षाचालकांच्या दोन गटांमध्ये मारहाण झाली. या घटनेत एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी सात रिक्षाचालकांना अटक करण्यात आली.

या विरोधात खारघरमधल्या 800 रिक्षाचालकांनी बंद पाळला आहे. तळोजा रिक्षाचालकांनी दगडफेक करून मारहाण केली असतानाही खारघर रिक्षाचालकांना अटक केली, असा आरोप खारघरमधील रिक्षाचालकांनी केला आहे.

जोपर्यंत अटक केलेल्या रिक्षाचालकांना जामीन मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशारा रिक्षा युनियनने दिला आहे.

आमच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात शहरात बंद पुकारला आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं एकता रिक्षा संघटनेचे अध्यक्ष केसरीनाथ पाटील म्हणाले.

पाहा व्हिडीओ