नवी मुंबईत विजेच्या धक्क्याने 21 वर्षीय गोविंदाचा मृत्यू
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 15 Aug 2017 10:04 PM (IST)
नवी मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेते, शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी ही दहीहंडी आयोजित केली होती.
नवी मुंबई : विजेचा धक्का लागल्याने नवी मुंबईत एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चुनाभट्टीत राहणाऱ्या जयेश शरले याला या घटनेत प्राण गमवावे लागले. ऐरोली सेक्टर 16 मधील सुनिल चौगुले स्पोर्ट्स कल्बमध्ये आयोजित दहीहंडीत हा प्रकार घडला. मंडळाच्या ठिकाणी जमिनीवर पडलेल्या वायरचा जयेशला शॉक लागला. नवी मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेते, शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी ही दहीहंडी आयोजित केली होती. दुसरीकडे, पालघरमध्ये दहीहंडीच्या थरावरुन पडून 21 वर्षीय गोविंदाचा जागीच मृत्यू झाला. धनसार काशीपाडा येथील रोहन गोपीनाथ किणी या 21 वर्षीय तरुणाला प्राण गमवावे लागले. दहीहंडीत थरावरुन उतराना फीट आल्याने तो जागीच कोसळला होता. मुंबईत दिवसभरात 46 गोविंदा किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी 45 जणांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आलं. एकावर मुंबईतील केईएममध्ये उपाचार सुरु आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा दुखापतग्रस्त गोविंदांचं प्रमाण कमी म्हणावं लागेल.