K C Venugopal : "पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी देशातील लोकशाही संपवली आहे," अशा शब्दात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी सोमवारी (17 एप्रिल) हल्लाबोल केला. तसंच या 'हुकूमशाही' विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.


वेणुगोपाल यांनी काल (17 एप्रिल) संध्याकाळी मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यांच्यात अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी के सी वेणुगोपाल यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, "मोदी आणि अमित शहा यांनी लोकशाही कशी नष्ट केली आहे हे आपण पाहिलं आहे. मोदींच्या हुकूमशाहीविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्यावर एकमत आहे."


बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा



  • सावकरांच्या विषयावरुन अडथळा होणार नाही

  • सावरकर मुद्दा दोन्ही पक्षाचे नेते सामंजस्याने हाताळणार

  • सध्यातरी सावरकर मुद्दा बाजूला ठेवून भाजपला लक्ष्य करणं हाच मुख्य मुद्दा 


काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपूर्ण ताकदीनिशी : के सी वेणुगोपाल


यासोबतच काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपूर्ण ताकदीनिशी असल्याचा शब्द वेणुगोपाल यांनी दिला. "काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी संपूर्ण ताकदीनिशी आहे. या शक्तींशी (भाजप) एकत्र येऊन मुकाबला करायचा आहे यावर सगळ्यांचं एकमत आहे. मग राहुल गांधीही मुंबईत नक्की येतील," असं के सी वेणुगोपाल यांनी म्हटलं.


उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा


या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता केंद्रातील विद्यमान सरकारवर निशाणा साधला. 'नरभक्षक' आणि 'सत्तेचे भुकेले' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


महाविकास आघाडीचं अडीच वर्षांचं सरकार


दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत शिवसेना-भाजपची युती तुटली. यानंतर शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं, जे गेल्या वर्षी जूनपर्यंत म्हणजेच अडीच वर्षे महाराष्ट्रात सत्तेत होतं. परंतुएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.