मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना जाहीरनामा कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे खासदार नारायण राणे यांनाही जाहीरनामा समितीत स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
राजनाथ सिंह यांच्या व्यतिरिक्त अरुण जेटली, पियूष गोयल, शिवराज सिंह चौहन यांच्यासह एकूण 20 नेत्यांचा आणि मंत्र्यांचा या कमिटीमध्ये समावेश आहे. भाजपच्या जाहीरनामा समितीत नारायण राणे यांना सोळावं स्थान देण्यात आलं आहे.
युतीत शिवसेना असल्यास मी युतीत सामील होणार नाही अशी नारायण राणे यांची भूमिका होती. मात्र त्याच नारायण राणेंचा भाजपच्या जाहीरनामा समितीत समावेश करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणेंचा जाहीरनामा समितीत समावेश हा भाजपचा शिवसेनेला इशारा आहे का? अशी चर्चाही आता रंगू लागली आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
जाहीरनामा कमिटी व्यतिरिक्त प्रचार-प्रसार समिती आणि सामाजिक स्वयंसेव संघटन संपर्क समितीची निर्मिती केली आहे. प्रचार-प्रसार समितीची जबाबदारी अरुण जेटली यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या समितीत जेटलींसह इतर आठ मंत्री आणि नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
तर सामाजिक स्वयंसेवी संघटन संपर्क समितीची जबाबदारी भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या समितीत भाजपच्या 13 मंत्री आणि नेत्यांचा समावेश आहे.