मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभारावर नाराज होत प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय नारायण राणेंनी घेतला होता. राणेंसोबतच गुरुदास कामत यांनीही प्रचारापासून दूर राहणं पसंत केलं होतं. मात्र तोंडावर आलेल्या निवडणुका पाहता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या असलेल्या दोन्ही नेत्यांची समजूत घातली.
मुंबईच्या प्रचारासाठी संजय निरुपम सक्षम आहेत. मला 25 जिल्ह्यात जायचं आहे. त्यामुळे मी मुंबईच्या प्रचारात सहभागी होणार नाही, असं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलं होतं. सेना- भाजपला शह देण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीसाठी आग्रही होतो. पण संजय निरुपम यांना आघाडीची गरज वाटत नाही, असं राणे म्हणाले होते.
पक्षश्रेष्ठींच्या प्रयत्नांना यश आलं असून गुरुदास कामतांनंतर नारायण राणेंचीही नाराजी दूर झाली आहे. नारायण राणे मुंबईच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना राणेंची तोफ पुन्हा धडाडणार आहे. काहीच दिवसांपूर्वी गुरुदास कामत यांनीही प्रचारात पुन्हा उतरण्याची तयारी दर्शवली होती.
मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होणार नाही. शिवाय शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्यामुळे काँग्रेस प्रचारासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करताना पाहायला मिळेल.